सर्वसाधारणपणे युद्ध, अंतर्गत गोंधळ, पूर, संसर्गजन्य रोग, साथ, आर्थिक मंदी यांसारख्या परिस्थितीत सरकारकडून आणीबाणी जाहीर केली जाते. मात्र, आफ्रिका खंडातील सोमालिया सरकारने टोळ किड्यांमुळे देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.
सोमालियामध्ये टोळ किड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तेथील अन्नधान्याच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांना अन्नधान्य पुरवणारी पिके या टोळधाडींमुळे नष्ट होत आहेत. देशभरामध्ये अनेक ठिकाणी एकाचवेळी टोळ्यांची संख्या हजारोंनी वाढली असून हे टोळ सामान्यपेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. त्यामुळे देशात आणीबाणी घोषित केली आहे, असे सोमालियाच्या कृषी मंत्रालयांनी म्हंटले आहे.
नेमका कोणता आहे हा किटक?
सोमालियामध्ये ज्या टोळ किड्याने विळखा घातला आहे, त्या किड्यांना ‘वाळवंट टोळ’ म्हणून ओळखले जाते. हा एक नाकतोडा प्रकारातील किटक आहे. या टोळांच्या प्रजननाच्या वेळीस यांची संख्या हजारोंने वाढते. आफ्रिका खंडातील या भागाला टोळधाड नवीन नाही, मात्र यावेळी यांची संख्या प्रमाणाबाहेर आहे.यापूर्वीही सन 1990 मध्ये सोमालियामध्ये सहावेळा मोठ्याप्रमाणात टोळधाडींचे प्रमाण वाढली होती. तर त्यानंतर 2003-04 मध्ये या किड्यांनी अन्नधान्यांची नासधुस केली होती.