जगभरात फोफावू लागलेल्या ‘करोना’ या जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणीबाणी घोषित केली आहे.या विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 10 हजार जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रकरण काय? :
- चीनमधील यूबेई प्रांतातील वुहान शहरात मूळ असलेला ‘करोना’ विषाणू (Coronavirus) हळूहळू जगभर पसरत आहे.
- अनेक देशांत ‘करोना’बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे.
- अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचं आवाहन केलं आहे. तर, काही देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर प्रवेशबंदी केली आहे.
WHO प्रमुख म्हणाले..:
- आरोग्यव्यवस्थेची स्थिती बेताची असलेल्या देशात ‘करोना’चा फैलाव वेगानं होऊ शकतो. केवळ चीनमधून येणाऱ्या व जाणाऱ्यांवर निर्बंध लादून हा व्हायरस रोखता येणार नाही.
- 15 हून अधिक देशांतील नागरिकांना आधीच त्याची लागण झाली आहे. ‘करोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांना एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. एकत्र येऊनच हे संकट थोपवलं जाऊ शकतं, असं WHO प्रमुख टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.