बॉडीबिल्डींगच्या विश्वात नाव कमावलेल्या व विविध स्पर्धेत किताब पटकावलेल्या अली सालेमानी या 35 वर्षीय बॉडीबिल्डरने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थीतीला हतबल होऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या मागे दोन मुली, एक मुलगा आणि बायको असा परिवार आहे. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.
अली सालेमानीने विरार पुर्वेच्या साईलीला अपार्टमेंटमध्ये राहत होता. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक परिस्थिला कंटाळला होता अशी माहिती आहे. त्यामुळे त्याने अखेर राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हे प्रकरण पोलिसात गेले असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.
अली सालेमानीने आत्तापर्यंत तीन वेळा वसईश्री, एकदा दहिसरश्री आणि ज्युनियर महाराष्ट्रश्री स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अनेक तरुणांना बॉडीबिल्डींग स्पर्धेसाठी मार्गदर्शन देखील केले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये अशाप्रकारे बॉडीबिल्डर तरुणांच्या आत्महत्या आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल ठाण्यात बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा स्टिरॉईडचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नावेद जमील खान असे या तरुणाचं नाव असून ठाणे शहरातील बॉडीबिल्डींग स्पर्धेत तो सहभागी होणार होता त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे बॉडीबिल्डर तरुणांचा अशाप्रकारे मृत्यू ही गंभीर बाब बनत चालली आहे.