मराठी चित्रपसृष्टी आणि हिंदीतील नामवंत कलाकारांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवुड मधील यशस्वी आणि आघाडीच्या अभिनेत्रीं पैकी एक म्हणजे प्रीति झिंटा. डिंपल गर्ल म्हणून ओळख असलेल्या प्रीति झिंटाचा जन्म 31 जानेवारी 1975 साली शिमल्यात झाला. मराठी रसिक प्रेक्षकांना सातत्याने दर्जेदार चित्रपटांची मेजवानी देणारा मराठी चित्रपट सृष्टीतला आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी आज वयाच्या 43 व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर छोट्या पडद्यावर ‘काहे दिया परदेस‘ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री सायली संजीव वयाच्या 27 व्य़ा वर्षात पदार्पण करत आहे. या तिघांनाही वाढदिवसा निमित्त बातमीदार तर्फे हार्दीक शुभेच्छा.
प्रीति झिंटा
हिमाचल प्रदेशच्या शिमला येथे जन्मलेल्या प्रीति झिंटाने मॉडलिंग आणि त्यानंतर लिरिल साबण आणि पर्क कॅडबरीच्या जाहिरातीं द्वारे बॉलिवुड प्रवेश केला. यानंतर शारुख खान आणि मनिषा कोइराला मुख्य भूमिका असलेल्या दिल से या पदार्पणातील चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिऴाला. यानंतर सोल्जर चित्रपटात अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम केले. हा चित्रपट त्यावर्षीचा हिट चित्रपट ठरला. तर क्या कहना या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रीति झिंटाला अभिनेत्री म्हणून वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी प्रीति झिंटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
आपल्या वेगवेगळ्या भूमिका आणि अभिनयाच्या जोरावर प्रीति झिंटाने हर दिल जो प्यार करेगा, मिशन कश्मीर, क्या कहना, दिल चाहता है, चोरी चोरी चुपके चुपके, फ़र्ज़,ये रास्ते हैं प्यार के, कल हो ना हो, लक्ष्य, वीर-ज़ारा, कभी अलविदा ना कहना, सलाम नमस्ते, जानेमन, झूम बराबर झूम, इश्क़ इन पॅरिस यांसारखे हिट चित्रपट दिले. तर कोई मिल गया हा तिचा व्यावसायिक दृष्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. सध्या आयपीएलच्या किंग्स इलेवन पंजाब या संघाची ती मालकीण देखील आहे.
अंकुश चौधरीचा प्रवास
आतापर्यंत अनेक हिट चित्रपट देणारा अंकुश चौधरी हा मराठी चित्रपट सृष्टीतील यशस्वी नायकांपैकी एक आहे. चित्रपट, मालिका, नाटक अशा अभिनयाच्या सर्वक्षेत्रात अंकुशने यश पाहिले आहे. तर त्याने मराठीसह हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अभिनेता गोविंदाच्या 2000 साली आलेल्या जिस देश में गंगा रहता है, या चित्रपटात मॉंंटी ही गोविंदाच्या भावाची भूमिका अंकुशने साकारली आहे. एकाच वर्षात जास्त कमाई आणि तीन-तीन हिट चित्रपट देण्याचा विक्रम अंकुशच्या नावावर आहे.
2004 साली आलेल्या सावरखेड एक गाव या चित्रपटातून त्याने मराठी चित्रपटात इंट्री मारली. 2006 साली यंदा कर्तव्य आहे, मातीच्या चुली, आई शप्पथ सारखे तीन हीट चित्रपट त्याच्या नावे आहेत. यानंतर “चेकमेट”, “गैर”, “रिंगा रिंगा”, “लालबाग-परळ” “उलाढाल”, “यांचा काही नेम नाही”, “शहाणपण देगा देवा”, “झकास”, “नो एन्ट्री पुढे धोका सारख्या हिट चित्रपटांचा अंकुशने सपाटाच लावला. कॉमेडी, सिरियस, वेगळ्या भूमिका साकराणाऱ्या अंकुशचा अभिनेता म्हणून प्रवास दिवसें दिवस फुलतच गेला. 2013 साली आलेल्या दुनियादारी चित्रपटातील अंकुशची डीएसपी ही भूमिका विशेष गाजली. या चित्रपटाने मराठीतील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. क्लासमेटस, दगडीचाळ, डबल सीट मागच्याच वर्षी आलेला ट्रीपल सीट सिनेमालाही प्रेक्षकांनी पसंती दिली. ती सध्या काय करते चित्रपटात त्याची शांत आणि वेगळी भूमिका भाव खाऊन गेली. तर या वर्षाच्या सुरवातीलाच आलेला धुरळा हा चित्रपट देखील चर्चेत राहिला.
सायली संजीव
मुळची धुळ्याची असलेली सायली गौरीच्या रुपाने घरा घरात पोहोचली. ‘काहे दिया परदेस’ या झी मराठी वाहिनी वरील मालिकेने तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. नाटक, जाहिरात, मालिकांसह सायलीने चित्रपटांमधुन देखील आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. “पोलीस लाईन’, “आटपाटीचा राजा”, “सातारचा सलमान”, “दाह” या चित्रपटांमधुन तीने काम केले आहे. तर सुवरत जोशी आणि तिचा मन फकीरा हा चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. सुहाना अंबारी मसाला, नीम कोलगेटच्या जाहिरातीतून ही सायली झळकली आहे. तसेच नुकतीच सायलीची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपटसेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.