चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण वसई- विरारमध्ये अढळल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खोटी असून, त्यात कोणत्याही प्रकारे तथ्य नाही अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी माहिती वसई- विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.तब्बसुम काझी यांनी दिली आहे. नालासोपारा पुर्वेकडील एक महिला नुकतीच चीनमध्ये जाऊन आली. कोरोना व्हायरस प्रांतात ती जाऊन आल्याने केवळ खबरदारी म्हणून तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षण तिच्यात आढळून आली नसल्याची माहिती डॉ. तब्बसुम काझी यांनी दिली आहे.
मुंबईच्या कस्तुरबागांधी रुग्णालयात त्या मुलीलावर करण्यात आलेल्या टेस्टचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. या संदर्भात रुग्णालयाने आम्हाला कळवले असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तब्बसुम काझी यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी हात स्वच्छ धुवा, स्वच्छता राखा, प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी विशेष काळजी घ्या, तसेक काही संशयास्पद वाटल्यास पालिकेच्या आरोग्य नागरिक केंद्राला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महापालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कोरोना, स्वाईन फ्लू सारख्या आजारांची आम्ही टेस्ट करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया व्हायरल मेसेज
कोरोना नावाचा भयंकर व्हायरस सध्या चीन या देशातून जगभरात पसरत आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसने चीनमध्ये 150 हुन अधिक जणांचा बळी घेतला आहे. खबरदारी म्हणून भारतीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. आजारी किंवा संशयास्पद वाटल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात आले आहे.