धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी 7.30 च्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात दुचाकी आणि ट्रकमध्ये झाला असून भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक देऊन अक्षरश: फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. या अपघातानंतर तेथील संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको केल्यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सदर अपघातात मृत पावलेल्या दुचारीस्वाराचे नाव राजेंद्र भावसार असे आहे. मृत राजेंद्र धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवासी असून अवधान औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र ऑइल मिलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. ड्यूटी संपवून राजेंद्र दुचाकीने गावी परतत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला सिमेंटचे पत्रे घेऊन जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्या धडकेत ट्रकने दुचारीसह राजेंद्राला फरफटत नेले, त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रला रूग्णालयात नेण्याअगोदरच प्राण सोडला.
ग्रामस्थांची मागणी
या अपघातानंतर कुंडणे गावच्या ग्रामस्थांनी फाट्यावर महामार्ग रोखून रस्तारोको केला. पोलीसांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतात या घटना रोखण्यासाठी गतिरोधक बसवावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.