गुलाबाच्या झाडाला नवीन फांद्या येऊन दर्जेदार फुले मिळण्यासाठी छाटणी करणं अतिशय महत्त्वाचं असतं. झाडावर जोमदार निरोगी फांद्या ठेवून उर्वरीत बारीक, कमजोर, रोगग्रस्त आणि निर्जीव फांद्या कापणं म्हणजे गुलाबाची छाटणी होय.
छाटणीचे काही प्रकार
- सौम्य छाटणी – या प्रकारच्या छाटणीत झाडाच्या शेंड्याकडील टोकंच फक्त मोठ्या प्रमाणावर कापली जातात. या छाटणीमुळे फुलं भरपूर प्रमाणावर लागतात. पण ती आखूड दांड्याची, लहान असतात.
- मध्यम छाटणी – यात फांद्या मध्यम उंचीवर म्हणजे 7 ते 10 डोळे ठेवून उरलेला भाग कापण्यात येतो. यामुळे मध्यम आकाराची भरपूर फुले येतात.
- कडक किंवा जोरकस छाटणी – यात फांद्या मूळ बुंध्यापासून 15 ते 20 से.मी. अंतर ठेवून बाकीचा भाग कापतात. यामुळे कमी पण उंच दांड्यावर मोठ्या आकाराची फुले येतात. अशा फुलांना अधिक मागणी आणि त्दरही चांगला मिळतो.
- छाटणीनंतर काळजी – कोणत्याही प्रकारच्या छाटणीनंतर फांद्यांच्या टोकांना एक टक्का बोर्डोपेस्ट लावावी. त्यामुळे मर रोग आणि खोड पोखरणार्या भुंगेर्यांपासून संरक्षण मिळतं. छाटलेल्या फांद्यांपासून आलेल्या नवीन फुटीवर 40 ते 50 दिवसात फुलं लागतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गुलाब फुलांची काढणी सूर्योदयापूर्वी झारदार सिकेटरने करावी.
छाटणीचे फायदे :
- झाडांच्या काही फांद्या कापून काढल्यास नव्या फुटी चांगल्या येण्यास मदत होते. या नव्या फुटींवर येणारी फुले आकाराने मोठी व संख्येने अधिक मिळतात.
- छाटणीमुळे झाडाचा आकार आणि आकारमान मर्यादित ठेवता येते.
- झाडाच्या खोडावर फांद्या व उप फांद्यांचा समतोल राखता येतो.
- छाटणीमुळे झाडात हवा व सूर्यप्रकाश खेळता राहतो. परिणामी रोगकिडीचे प्रमाण कमी होते.
- गुलाबाची छाटणी फांद्याची विरळणी, झाडाला आकार आणि नवीन फूट येण्याच्या उद्देशाने केली जाते. त्यामुळे छाटणी करताना प्रथमतः जुन्या वाळलेल्या, कमकुवत, एकमेकात गुंतलेल्या, रोग व कीडग्रस्त फांद्या तळापासून काढून टाकाव्यात.
- 1 वर्षाची जुनी वाढ एका विशिष्ठ उंचीपर्यंत अथवा लांबीपर्यंत ठेवून पूर्ण छाटावी. यामुळे नव्याने येणारी फूट जोमदार, निरोगी येते.