केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जून पासून ही योजना संपूर्ण देशभर राबविली जाणार आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे ‘या देशातील नागरिकांना त्यांच्या गरजेचे, अधिकाराचे अन्न मिळावे’ हा आहे. दरम्यान, ही योजना लागू झाल्यानंतरही जूने रेशन कार्ड वापरात राहणार आहेत.
नेमकी काय आहे ही योजना?
- ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेमुळे ग्राहकांना संपूर्ण देशात, कोणत्याही राज्यात व गावात सहज रेशन मिळवता येणार आहे.
- या योजनेत 10 अंकांचे रेशन कार्ड असणार आहे. यातील पहिले दोन अंक राज्याचा कोड असणार आहे. त्यानंतरचे दोन अंक रेशन कार्डच्या संख्येनुसार असतील. त्यानंतरचे दोन अंक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करून देणारे असतील.
- तसेच हे रेशनकार्ड मराठी आणि हिंदी या दोन भाषेत जाहीर केले जाणार आहे.
‘एक देश एक रेशन कार्ड’ ही योजना पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या 12 राज्यात 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. तर आता 1 जून पासून संपूर्ण देशातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.