‘पिस्तुल्या’ या लघुपटापासून ‘फँड्री’, ‘सैराट’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे आणि नाळ या चित्रपटाची निर्मीती करणारे कवी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच ‘झुंड’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहे. ‘झुंड’ हा चित्रपट नागरांज यांचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. तसेच या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन काम करणार आहेत. बिग बी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा फस्ट लूक पोस्टर शेअर केला आहे.
या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन पाठमोरे उभे असून ते एका झोपडपट्टीसमोर उभे राहुन कसला तरी विचार करताना पाहायला मिळत आहे.
‘झुंड’ या चित्रपटाची कथा विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे विजय बरसे कोण? तर विजय बरसे यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत एक फुटबॉल टीम तयार केली होती. त्यांच्या या कथेवर ‘झुंड’ हा संपूर्ण चित्रपट आधारित आहे.
‘सैराट’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले नागराज मंजुळे आणि प्रत्यक्ष बिग बी अमिताभ बच्चन एकत्र काम करत असल्याने सर्वाच ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे.