राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.त्यामुळे काही शहराचा पारा घसरलेला पाहायला मिळाला. उत्तरेकडून येणारे वारे आणि पश्चिम प्रकोपानंतरची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) परिस्थिती, यामुळे राज्यातील या भागात थंडी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर कोकणात तुलनेने उल्लेखनीय घट, मराठवाडय़ात किंचित वाढ झाली. तर विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.
मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात अनेक ठिकाणी पारा ११ ते १५ अंश दरम्यान राहीला. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
हवामान विभाग
उत्तर महाराष्ट्राला शनिवारी थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता, तर आणखी दोन दिवस बोचऱ्या थंडीचा मुक्काम राहील असा अंदाज आहे.
पुढील दोन दिवसांत मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, तर राज्यभरात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
शहरांतील तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) १४.५, सांताक्रूझ ११.४, अलिबाग १२.९, रत्नागिरी १४.१, पुणे ८.२, नाशिक ६.०, नगर ९.२, जळगाव ७.०, कोल्हापूर १४.५, महाबळेश्वर १०.०, मालेगाव ८.२, सांगली १४.०, सातारा १०.२, सोलापूर १५.७, औरंगाबाद ८.१, परभणी १२.७, नांदेड ११.५, बीड १३.३, अकोला १२.४, अमरावती १४.०, बुलडाणा ११.४, चंद्रपूर १६.२, गोंदिया १३.६, नागपूर १५.१, वाशिम १३.६, वर्धा १७.६ आणि यवतमाळ १४.४.