देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी असली तरी सर्वजण एकत्र येतात, हि देशाप्रती ही सद्भावना महत्वाची असल्याचे राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सांगितले. वसईत आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला नेतेमंडळीसह असंख्य नागरिक उपस्थित होते.
उत्तरांचल मित्र मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा वसईतील श्री बद्रीनाथ मंदिर परिसरात श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रम आयोजित होतात. या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थितीत होती. यंदाचे हे नववे वर्ष होते. याप्रसंगी वसई-विरारचे महापौर प्रवीण शेट्टी, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष गोपालसिंग मेहरा, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे आदीसह नागरिक उपस्थित होते.
जसे भागवत कथेत श्रीकृष्ण मथुरेसह द्वारकेलाही जाऊन राहिले, तसेच महाराष्ट्र असो की उत्तरांचल माणूस कोठेही राहिला तरी देश हा महत्वाचा असतो. त्यामुळे मानवाने कोठेही गेले तरी मातृभूमीला विसरू नये असे आवाहन कोश्यारी यांनी याप्रसंगी केले. तसेच वसई मध्ये चारधाम मधील पवित्र बद्रीनाथ मंदिराचे निर्माण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यांनतर इस्कॉन संस्थेच्या श्री रघुवीर दास (प्रभुजी) यांच्यामार्फत ही कथा सादर केली गेली. त्यांनतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.