राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असताना, रस्त्यांवर अथवा दुकानाबाहेर झोपणाऱ्या गरिबांची अवस्था बिकट आहे. त्यांना थंडीत कुडकुडत झोपावे लागते. त्यामुळे या गरिबांची हि अवस्था बदलण्यासाठी ‘हॅपी वाली फिलिंग’ या गरिबांना चादर आणि कांबळी वाटप करून त्यांना मायेची ऊब दिली. यावर गरिबांनी या संस्थेचे आभार मानले.
“हॅपी वाली फिलिंग” नावाच्या नवी मुंबईतील समूहाने संक्रांतीच्या सणांचे औचित्य साधून सानपाडा येथील ब्रिज खाली बांबूच्या पाट्या बनवून आणि विकून उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या वस्तीतील गरजूंना चादर आणि कांबळी वाटप करण्याचा उपक्रम राबवला आहे.
दरम्यान, नेहमीच समाजकार्यात गरजू आणि लहान मुलांच्या आनंदासाठी निस्वार्थपणाने हॅपी वाली फिलिंग हि संस्था काम करते. ‘चादर नव्हे, तर निखळ माणुसकीची उबच’ या ब्रिदवाक्या अंतर्गत प्रोजेक्ट “वॉर्म विशेस” नावाने या समूहाचा हा चौथा चादर वाटप उपक्रम पार पाडला. याआधीही मुंबई-नवी मुंबईतील दोन वेगवेगळ्या वस्तीत तसेच सांगली मधील व्ही. एस. नेर्लेकर कर्णबधिर मुलांच्या राहत्या शाळेत हा उपक्रम राबवलेला असून या पुढे जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार या संस्थेने केला आहे.
आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सण साजरे करण्याचा हक्क आहे. मात्र, त्यांच्या गरीबीने त्यांना सणांचा आनंद अनुभवायला मिळत नाही. तसेच अनाथ व अपंगत्व आलेले मुलानाही प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक संस्थांप्रमाणे सामान्य नागरिकांनीही प्रयत्न केला पाहिजे. अशाना मदतीचा हात देणारी हॅपी वाली फिलिंग हि संस्था अग्रस्थानी असते.