बहुचर्चीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर सैनिक तानाजी मालुसरे यांच्या शौर्यांची गाथा सांगणारा तानाजी द अन-संग वॉरिय़र हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दुसरा आठवड्यातही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशातच कोल्हापुरातील हॉटेल मालक एक इतिहास प्रेमी आणि शिवभक्ताने तानाजी चित्रपट पाहणाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. तुमच्याकडे तानाजी चित्रपट पाहिल्याचे तिकिट असेल तर ज्योतिबा तसेच पन्हाळा दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी मोफत राहण्याची सोय करण्यात येणार आहे.
कुठे आहे हॉटेल
कोल्हापुरात राहणारे विनोद उत्तम पाटील या शिव भक्ताने आपल्या ओमसाई हॉटेल आणि लॉजिंग नामक हॉटेलमध्ये तानाजी चित्रपटाचे तिकिट दाखवणाऱ्या पन्हाळगड व ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांसाठी मोफत राहण्याची खास ऑफर ठेवली आहे. त्यांचे ओम साई हे हॉटेल वघबिळ पन्हाळा रोड कोल्हापूर येथे आहे. गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भातल मेसेज व्हाटसपवर व्हायरल होत असून, त्याची शाहानिशा करण्यासाठी आम्ही विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ही ऑफर आपणच दिली असून ती खरी असल्याचे विनोद पाटील यांनी बातमीदारशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे आत्ताच नाही तर मुलांच्या मे महिन्याच्या सुट्टीत आलात तरी चालेल, पण येताना केवळ तिकिट घेऊन या असे देखील त्यांनी सांगितले आहे.

हॉटेल ओम साई
खुद्द तानाजींच्या वंशजांनी घेतली दखल
मुख्य म्हणजे विनोद पाटील यांच्या या विशेष उपक्रमाची दखल वीर तानाजी मालुसरे यांच्या 12 व्या पिढीतील वंशज सुनिता नितिन मालुसरे यांनी घेतली आहे. त्यांनी मालुसरे परिवारा तर्फे विनोद पाटील यांना शुभेच्छा दिल्या असून, जे वर्तमानात इतिहासाला विसरत नाहीत तेच इतिहास घडवतात आणि त्यांचे भविष्य उज्वल असते अशी प्रतिक्रिया दिली.
तानाजींचे शौर्य
दरम्यान, स्वराज्यासाठी जिजाबाईंंच्या इच्छेखातर; कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला हि जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. मात्र त्यांनी ही तयारी अर्धवट सोडत शिवबांच्या आदेशाला प्राधान्य देत, जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले.आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत.
4 फेब्रुवारी 1670 ला किल्ला जिंकला मात्र तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. हे दुसर्या दिवशी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे सिंहगडावर पोहचले तेंव्हा त्यांना समजले.त्यावेळी महाराज म्हणाले “गड आला पण सिह गेला”.