पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून राष्ट्रवादीलाही घवघवीत यश मिळाले आहे. तर भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला 18 जागा आल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळविण्यात यश आलं आहे. त्यामुळे बहुमताचा 29 आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला भाजपा अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे.
पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. यामध्ये मंगळवारी झालेल्या मतदानात जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये 68 टक्के मतदान झाले होते.त्यामुळे जिल्हा परिषदांवर कुठला पक्ष बाजी मारतो याची उत्सुकता होती.
दरम्यान आज हाती आलेल्या निकालात सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. 57 पैकी 17 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळविण्यात यश आले आहे. तर भाजपला यावेळी मोठा फटका बसला आहे. भाजपला निव्वळ 10 जागांवरचा समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसने आपली एक जागा राखण्यात यशस्वी झालेत. तसेच बविआला 4 व इतर पक्षाकडे 9 जागा आहेत.
पालघर जिल्हा परिषदेवर वर्चस्व गाजवण्यासाठी 29 हा बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. शिवसेनेला 18 जागा आल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 11 जागांची गरज आहे. त्यातच राष्ट्रवादीला 15 जागा आल्याने येथे महाविकासआघाडीची सत्ता येणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती निकाल
पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. तालासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे गेली. तर जव्हार पंचायत समिती भाजपाकडे आहे. विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू, वाडा आणि वसई या तीन पंचायत समित्यांवर महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाले आहे.
पालघर जिल्हा परिषद निकाल
- शिवसेना : 18
- माकपा : 06
- भाजप : 10
- राष्ट्रवादी : 15
- काँग्रेस : 01
- बविआ : 04
- मनसे : 0
- अपक्ष : 03
- एकूण ५७ जागा