आज डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ‘एएलएस’ आजाराने ग्रासल्याने आयुष्यभर खुर्चीवर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र अपंगत्वावर मात देत ब्रह्मांडातल्या अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध त्यांनी घेतला.
बुद्धीकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतं हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिलं अशा ख्यातनाम शास्त्रज्ञ यांच्या विषयी काही खास गोष्टी आज आपण जाणून घेऊ…
स्टीफन यांच्या विषयी काही खास गोष्टी
- ब्रह्मांडाच्या उत्त्पतीविषयी अनेक महत्वपूर्ण सिद्धांत मांडणारे स्टीफन हॉकिंग हे शाळेत असताना मात्र फारसे हुशार नव्हते.
- महाविद्यालयात त्या काळी ठराविक पद्धतीचे कपडे घालण्याची प्रथा होती पण, स्टीफन यांना साचेबद्ध आयुष्य जगणं पसंत नव्हतं ते नेहमीच रंगीबेरंगी कपडे घालून महाविद्यालयात यायचे.
- शाळेत हॉकिंगला ‘आइनस्टाइन’ असं ओळखलं जात असलं तरी काही संदर्भानुसार हॉकिंग यांचे शाळेतील गुण मात्र एका सरासरी विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षाही कमी होते.
- ‘प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ हा त्यांचा प्रबंध गेल्यावर्षी केंब्रिजनं ऑनलाइन प्रसिद्ध केला होता. हा प्रबंध इतका हिट ठरला की जगभरातील लाखो लोकांनी प्रकाशित होताच तो डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला आणि केंब्रिजची वेबसाईट अक्षरश: क्रॅश झाली होती.
- शाळेत असताना आपल्या काही वर्गमित्रांच्या मदतीनं त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून चक्क कॉम्प्युटर तयार केला होता.
- स्टीफन यांना जेव्हा एका मुलाखतीत विश्वातील सर्वात गुढ गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला होता तेव्हा ‘स्त्री’ ही जगातील सर्वात गूढ गोष्ट असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं.
- 2007 साली स्टीफन यांनी शून्य गुरूत्त्वाकर्षण शक्तीचा अनुभव घेतला. त्यावेळी कित्येक वर्षींनी प्रथमच ते आपल्या व्हिलचेअरवरून उठले होते.
- एलियन्स असू शकतात असं मानणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी स्टीफन एक होते.
- जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
आज ते आपल्यात नाहीत पण त्यांचं संशोधन मानवाला पुढील अनेक वर्ष उपयोगी पडत राहील. या थोर शास्त्रज्ञाला भावपूर्ण आदरांजली.