महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्ष नवीन झेंड्यासह मैदानात उतरणार असल्याची चर्चा असतानाच, आता राज्य सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकाऱ्यानी मनसेत प्रवेश केला आहे. आगामी काळात याचा मनसेला मोठा फायदा होणार आहे.
रायगडमधील पेण, मुरुड भागातील शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. शिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही मनसेची वाट धरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.स्थानिक नेत्यांची मनमानी व पद मिळत नसल्याने या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केला आहे.
झेंडा बदलणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनाची दिशा बदलल्यानंतर आता झेंड्याचा रंग देखील बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार आहे. विशेष म्हणजे झेंड्यामध्ये शिवरायांची मुद्राही छापली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केले आहे. याच दिवशी या झेंड्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.