विरार पश्चिमेत एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मनीषा डोंबळ (63) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराट नगरमधील ग्रीष्मम सोसायटीतील तळ मजल्यावर डोंबळ कुटुंब राहत आहे. या कुटुंबात मनोहर डोंबळ त्यांच्या पत्नी मनीषा डोंबळ आणि त्यांची पुतणी निशा सह राहत होते. मनोहर मुंबईतील एका हॉटेल मधून निवृत्त झाले होते आणि सद्यस्थितीत विरार मध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. तर त्यांची पत्नी मनीषा या गृहिणी होत्या. तर निशा कॉलेज मध्ये शिकत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती मनोहर आपल्या कामावर गेले होते तर पुतणी निशा कॉलेज मध्ये गेली होती. या दरम्यान मनीषा एकट्याच घरी होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून चोरी करत मनीषा यांच्या गळ्यावर चाकूने हल्ला करून हत्त्या केली. सायंकाळी 4 च्या दरम्यान हि घटना घडली आहे.
दरम्यान संध्याकाळी जेव्हा मनोहर आणि निशा घरी आले त्यावेळी हि घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी विरार ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.या तक्रारीवरून विरार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.