ओठ मऊ मुलायम ठेवण्यासाठी लिप बामचा वापर होतो. ओठांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी लिप बाम महत्वपूर्ण भूमिका बजावतो. म्हणूनच ओठ उलणं, रक्त येणं, भेगाळणं, काळवंडणं या समस्यांवर उपाय म्हणून लिप बामचा नियमीत वापर केला जातो. पण हे उपयुक्त अनेक कामांसाठी साह्यभूत ठरतं.
- बरेचदा नखांच्या आजूबाजूची त्वचा भेगाळते. त्वचेवरील पापुद्रे निसटू लागतात. अशा वेळी नखांजवळील लिप बाम लावणं हा परिणामकारक उपाय ठरतो. यामुळे त्वचा मऊ राहून दोन दिवसातच परिणाम दिसू लागतो.
- सर्दी झाल्यास नाकाजवळची त्वचा कोरडी पडते. सतत पुसल्यामुळे नाकाची आग होते. अशा वेळी नाकपुड्यांच्या अग्रभागी लिप बाम लावणं हो योग्य उपाय ठरतो. टाचा भेगाळणं, टाचांना चिरा पडून रक्त येणं ही अनेकींची समया असते. या भेगाळलेल्या टाचांवर लिप बाम लावल्यास मऊपणा अनुभावयला मिळतो आणि वेदना कमी होतात.
- थ्रेडिंग करण्यास वेळ नसेल आणि भुवया शेपलेस दिसत असतील तर लिप बामचा वापर करावा. भुवयांवर लिम बामचा हलका हात फिरवल्यास शेप नीट दिसतो. गाल हायलाईट करायचे असतील तर चीक बोन्सवर लिप बाम लावणं हा योग्य उपाय ठरतो.
- नवी चप्पल अथवा सँडल घातल्यानंतर पायांना इजा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी नवी पादत्राणं घालण्याआधी पायांना लिप बाम लावावा. यामुळे पाय सुरक्षित राहतील.
- झीप ही वारंवार नादुरूस्त होणारी बाब आहे. झीप काम करत नसेल तर त्यावर तुम्ही लिप बाम लावू शकता. हा बाम लुब्रिकंटसारखं काम करतो आणि नादुरूस्त चेन नीट काम करू लागते.
- अंगठी बोटात रूतल्यास काढण्यासाठीही लिप बामचा वापर करता येतो. बोटाला लिप बाम लावल्यानंतर अंगठी लवकर निघते.