वसई विरार महापालिका एकीकडे कचरा वर्गीकरण करण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेकडे कचऱ्याचे डबेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासला जात आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने जाहिरात बाजीवर करोडो रुपये खर्च करत नागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर शहरातील प्रत्येक प्रभागाप्रमाणे कचऱ्याच्या डब्याचा पुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे नालासोपारा जीवन विकास सोसायटीला सुद्धा कचऱ्याचे डब्बे पुरविण्यात आले. मात्र सोसायटीतील आता जुनाट झालेल्या या कचरा डब्ब्यांची अवस्था खराब झाली आहे. तसेच कचरा टाकल्यावर त्यांची दुर्गधी व ओल्या कचरा डब्ब्यातील घाणेरडे पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये रोगराई पसरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. या प्रसंगी जीवन विकास सोसायटीचे रहिवाशी मदनसिंग सेजवाल यांनी त्यांच्या सोसायटीतील ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे दोन्ही डबे फुटले असून त्या संदर्भात मागील सहा महिन्यापासून महापालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा लावला आहे पण अजूनही त्यांना डबे मिळाले नाहीत. हि निव्वळ याच सोसायटीची घटना नसून अशा प्रकारे विरार, नालासोपारा, वसई परिसरात शेकडो सोसायटीने कचऱ्याच्या डब्यासाठी महापालिका आणि स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्याकडे अर्ज केले आहेत. पण त्यांच्या पदरी केवळ निराशाच आली आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने दिलेले डबे वर्षभराच्या आतच निकामी झाल्याने पुन्हा डब्याची मागणी वाढत गेली. आणि महापालिकेकडे मागील काही महिन्यापासून कचऱ्याचे डबेच नसल्याने नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच डब्यात किंवा फुटक्या डब्यात सुका आणि आणि ओला कचरा टाकावा लागत आहे. त्यामुळे महापालिका राबवत असलेले स्वच्छ भारत अभियान सपशेल अपयशी ठरले आहे.
महापालिका अभियंता माधव जवादे यांनी दिलेल्या महिनीनुसार महापालिकेकडे सध्या एकही डबा नाही आहे. ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत डबे मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.