नालासोपारा पूर्वेकडील सहाय्यक निबंधक -२ वसई -३ या रजिस्ट्रेशन कार्यालयात इंटरनेटच नेटवर्कच व्यवस्थित मिळत नसल्याने नागरिकांचे कामकाज रखडत होते व सरकारचे लाखो रुपयांचेही नुकसान होत होते. रोजच्याच या प्रकारामुळे नागरिक कंटाळले होते. याप्रकरणी नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसेला) सदर प्रकरण सांगितल्यावर तत्काळ या कार्यालयावर धडक देत टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर तीन तासात नेट सुरु झाले व नागरिकांना दिलासा मिळाला.
पूर्वेच्या सहाय्यक निबंधक -२ वसई -३ या रजिस्ट्रेशन कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून इंटरनेटची समस्या भेडसावत होती. रोजच्याच झालेल्या या समस्येने नागरिकांना आपले कामकाज बुडवून संपूर्ण दिवस या कार्यालयात घालवावा लागत होता. त्याचबरोबर इंटरनेट व्यवस्थित न चालत असल्याने सरकारचेही मोठे नुकसान होत होते.
या प्रकरणी नागरिकांनी मनसेकडे धाव घेत सदर घटना सांगितली. यावर मनसेचे वसई विरार शहर जिल्हा संघटक विजय मांडवकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रजिस्ट्रेशन कार्यालयात घुसून सादर प्रकाराचा जाब विचारला. तसेच ४ दिवसापासून बंद असलेले नेट येत्या ४ तासात सुरू न केल्यास रजिस्ट्रेशन व बी. एस.एन.एल. कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली.
मनसेच्या या इशाऱ्यानंतर त्वरित दुय्यम निबंधक कडाळे यांनी बी.एस.एन.एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करीत नेट सुरू करण्याची मागणी केली. तसेच कंपनीने ३ तासातच नेट सुरू करून नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.