वसईची प्रमुख ओळख असलेल्या प्रसिद्ध केळीला बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे केळीच्या बागांवर याचा मोठा प्रादुर्भाव झाला असून बागायतदारांच्या बागा नष्ट होण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
वसईत 55 हेक्टर क्षेत्र परिसरात केळीच्या शेतीची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने वेलची केळी, बिनबोंड, लोखंडी बंगाली, बनकेळ, भूरकेळ, राजेळी अशा विविध प्रजातींच्या केळीची लागवड केली होते. या सर्वच प्रजातींच्या केळीच्या पानांना बुरशीजन्य रोगाने ग्रासले आहे. केळीच्या पानाच्या वरच्या भागाला काळपट असा थर दिसत असून खालच्या भागावर सफेद बुरशी लागली आहे. त्यामुळे प्रत्येक केळीच्या बागांना याचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे निव्वळ केळीच्या बागावर आपला उदरनिर्वाह करणारा हा शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
वसईतील केळी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिकरीत्या वाढवली जातात. त्यामुळे त्यांना वसईसह मुंबईतल्या बाजारपेठांमध्ये मागणी जास्त असते. मात्र यंदा बुरशीजन्य रोग लागल्यामुळे केळीचे उत्पादन फारच कमी होणार असल्याची चिंता अनेक बागायतदारांना सतावतेय. सध्या वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागल्याने काही ठरवीक ठिकाणीच केळीची लागवड केली जात होती त्यातच आता केळींना बुरशीजन्य रोग होत असल्याने केळीची शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत.
आम्ही केळीच्या बागांची पाहणी करत आहोत. केळीवर हि बुरशी का लागतेय हे तपासण्यासाठी पथकही नेमेले आहे. तसेच पहाणी करूण उपाययोजना शेतक-यांना सांगण्यात येत आहेत.
-आर. डी. शिरसाट, तालुका कृषी अधिकारी, वसई.