वसई-विरार परिसरात गेल्या काही महिन्यापासून अनधिकृतपणे रिक्षा वाहतुकीचे व रिक्षाचालकांकडून तरुणीवर अतिप्रसंग केल्याचाही प्रकार समोर आले होते. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी वसई वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीर 56 रिक्षा चालकांवर रात्री उशिरापर्यत कारवाई केली. या कारवाईत असंख्य रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करत परवाने जप्त करण्यात आले आहेत.
शहरात वाहतूक नियम पायदळी तुडवत असंख्य चालकांची रिक्षा वाहतुक सुरु होती. तसेच संध्याकाळी वाहतुक पोलीस गेले कि, या अनधिकृत रिक्षा बाहेर पडायच्या. त्यामुळे मोठा प्रमाणावर शहरात अनधिकृतपणे रिक्षा वाहतुक सुरु होती. त्यातच गेल्या आठवड्यात एका रिक्षा चालकांकडून तरुणीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला होता.या घटनेमध्ये तरुणीने स्वत:च्या बचावासाठी रिक्षातून उडी मारली. यामध्ये तिला मोठी दुखापतही झाली. या घटनेनंतर या अनधिकृत रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.
या सर्व प्रकारणाचा मुद्दा शहरात जागत होता व वाहतूक पोलिसांच्या कामगिरिवर संशय व्यक्त होत होता. त्यानंतर या सर्व घटनांवर अंकुश बसवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विरारमध्ये बुधवारी रात्री उशीरापर्यंत रिक्षा चालकांवर कारवाई केली. मनवेल पाडा नाका, फुलपाडा, विरार पश्चिम, विरार पूर्व स्टेशन परीसरातील वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या तब्बल 56 रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये परमिट, लायसन्स, बॅच, वाहनाची कागदपत्रे नसणाऱ्या व दारू पिऊन वाहन चालवऱ्या रिक्षा चालकांचा समावेश होता.
दरम्यान शहरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाहतूक कोंडीही काहीशी कमी झाली. त्याचबरोबर अनधिकृत रिक्षा चालकांना आळा बसल्यामुळे प्रवाशांनी चांगलाच सुटकेचा निश्वास सोडला.