गेल्या साधारण वर्ष भरापासून या चित्रपटाची चर्चा होती, अखेर शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, हिंदुस्तानाच्या इतिहासातल्या अनेक ऐतिहासिक युध्दांपैकी एक युध्द म्हणजे पानिपतची लढाई. जितका युध्दाचा इतिहास मोठा आहे, जितके हे युध्द इतिहासात गाजले, तितक्याच मोठ्या आणि भव्यदिव्य स्वरुपात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. मुळात मराठा साम्राज्याचा, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर साकारणे हेच मोठे आवाहन होते. चित्रपटातील गाणी, प्रत्येक बारकावे, राजकारण, युध्द यांचा मेळ साधुन दिग्दर्शकाने चांगली मोट बांधली आहे.
अंगावर शाहारे आणणारे प्रसंग
पानिपत कडे इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर मराठे हे युध्द हरले, पण या युद्धाची भीषणता इतकी होती, लाखो महिला या युध्दात विधवा झाल्या, रक्ताने संपुर्ण युद्धभूमी अक्षरशा लाल झाली होती. चित्रपटातील सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष होते. अभिनेता अर्जुन कपुरने ही भूमिका साकारली असून, तो या भूमिकेला न्याय देऊ शकेल का असे सगळ्यांना वाटत होते. मात्र अर्जुन कपुर हे आवाहन बऱ्या पैकी पेलण्यात यशस्वी झाल्याचे चित्रपट पाहताना जाणवते. अर्जुन कपुरने या रोलसाठी घेतलेली मेहनत आणि दिग्दर्शकाने त्याच्यावर केलेली मेहनत अनेक दृष्यांमधुन दिसते. मध्यांतरा नंतर चित्रपटात युध्दाला सुरवात होते. यावेळी उसळणाऱ्या तलवारी त्याला प्रतिकार करणारे मराठे, वाहणारे रक्त, एक-एक प्रसंग पाहताना अंगावर शहारे येतात. अहम शाहा अब्दालीच्या भूमिकेत असलेल्या संजय दत्तने देखील भूमिका पडद्यावर चांगली साकारली. पार्वतीबाईच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सनॉन आणि सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेतील अर्जुन कपुर या दोघांची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका असून, पार्वतीबाईंच तेज आणि लकब क्रिती सेनने चांगल्या प्रकारे साकारल आहे. शत्रुची वाढलेली ताकत पाहिल्यावर हत्ती वरुन उतरुन थेट शत्रुशी दोन हात करण्यासाठी सदाशिवराव भाऊ युध्दभूमिवर उतरल्यावरचा प्रसंग अंगावर शहारे आणतो.
मराठी कलाकारांचा अभिनय
दरम्यान, मराठ्यांची गौरवशाली गाथा असल्याने, अनेक मराठी कलाकार या चित्रपटात आहेत. बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रवींद्र महाजनी यांना पाहण्याची संधी त्यांच्या फॅन्सना मिळणार आहे. जनकोजी शिंदे या भूमिकेला गश्मिर महाजनी याने पुरेपुर न्याय दिला आहे, तर मिलिंद गुणाजी, कश्याप परेळेकर यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. युद्ध प्रसंगा दरम्यान, असलेल अप्रतिम बॅगराऊंड म्युझिकने पुन्हा एकदा अजय- अतुलने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. मराठे जरी हे युद्ध हरले असले, तरी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपट जरुर बघावा.