Ads
बातमीदार स्पेशल

जगाला प्रेरणा देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व !

dr ambedkar
डेस्क desk team

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ओळखले जाते. आज 6 डिसेंबर. यादिवशी भारताच्या महामानवाची प्राण ज्योत मावळली. तसेच त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी संपूर्ण देशात हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. अशा आंबेडकरी महाप्रलयाला ‘बातमीदारचे विनम्र अभिवादन

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारकर्ता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या शरीराचा कण कान झिजवला.  डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन  म्हणून ओळखले जाते.  पण अस कोणताही क्षेत्र नाही ज्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली नाही. आज केवळ भारताला त्यांनी राज्य घटनाच नाही दिली तर. भारतीयांच्या अधिकारांचे संरक्षण करून सर्वांना समान अधिकार दिला.

भीमराव रामजी आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले. आणि आज सर्व भारतीय नागरिक म्हणून समान गणले जातात.

 

जीवन परिचय

 • भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकरांचे जन्म 14 एप्रिल 1891 ला रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी मध्यप्रदेश येथील इंदौर जवळील महु या लष्करी छावणीत झाला होता.
 • बाबासाहेबांच्या जन्मानंतर तीन वर्षांनी त्यांचे वडिल रामजी निवृत्त झाले ते इंडियन आर्मीत सुभेदार होते. निवृत्तीनंतर बाबासाहेबांचे संपुर्ण कुटुंब महाराष्ट्रात स्थायिक झाले. भीमराव हे आपल्या आई-वडिलांचे 14 वे अपत्य होते. तर 1906 साली त्यांचा 9 वर्षीय रमाबाईंसोबत विवाह झाला होता.
 • भिमरावांचे मुळगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील आंबडवे हे आहे. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीतील ते असल्याने सामाजिक भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले.
 • उच्च शिक्षण घेण्याकरीता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.

शिक्षण

 • बाबासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण दापोलीत झाले. त्यानंतर 1908 साली त्यांनी मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कुलला प्रवेश घेतला. तर उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले दलित विद्यार्थी ठरले. त्यावेळी एक नवा इतिहास त्यांनी रचला.
 • बाबासाहेब हे लहानपणापासूनच हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. उच्च शिक्षणासाठी म्हणजेच एम.ए.पदवी संपादन करण्यासाठी 25 जुलै 1913 साली बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तर प्रो. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जून 1915 साली त्यांनी दुसऱ्यांदा एम.ए.ची पदवी संपादन केली.
 • ऑक्टोबर 1916 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे एस.एस.सी इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. तर त्यांनी 1920 साली प्रो. कॅनन आणि सेडनी यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी मिळवली.
 • बाबासाहेब  एम.ए, पीएच.डी, एलएल.डी, बार अॅट लॉ इत्यादी पदव्यांनी उच्चविद्या विभूषित झाले. एकूण 32 पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. इतक्या पदव्या संपादित करणारे ते पहिले भारतीय आहेत.
 • एवढेच नाही तर बाबासाहेबांनी जगातील सामाजिक शास्त्रांचा सखोल अभ्यास केला आहे. त्याचबरोबर जगातील साम्राज्यशाही, भांडवलशाही, जगातील युद्ध-लढाया आणि जागतिक स्तरावरील गुलामांच्या जीवनाचाही अभ्यास त्यांनी केला.

अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव लढाई

 • भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जाती-पातींच्या, विषमतेचे चटके त्यांना सतत सहन करावे लागले. यामुळे जातिव्यवस्थेच्या विरोधात लढण्याचा विचार केला. त्यावेळी त्यांना अपमान, अनादराचा सामना करावा लागला होता. मात्र, असे असूनही त्यांनी ते आपले कर्तव्य समजून त्या विरोधात काम चालू ठेवले.
 • सर्वप्रथम 1919 साली साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी दलित व इतर मागास समाजांसाठी वेगळे मतदान विभाग आणि आरक्षणांची मागणी केली.
 • आंबेडकरांनी 1920 साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.
 • सन 1926 ला ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य बनले. तर 1927 साली त्यांनी अस्पृश्यतेविरूद्ध जागृती करण्याचा निर्णय घेतला आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणि हिंदू देवळातील प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरूवात केली.
 • 4 ऑगस्ट 1923 साली रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी.के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला, त्यानुसार  सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली. सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी दिली होती. त्यानुसार महाड येथील चवदार तळे ही अस्पृश्यांसाठी खुले असल्याचे जाहीर केले.
 • मात्र, उच्चवर्णीय लोकांनी  त्यांना पाणी घेण्यास मनाई केल्यानंतर बाबासाहेबांनी 19-20 मार्च 1927 रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरवली आणि या परिषदेत  अस्पृश्यतेचा धिक्कार करत, सदरचे ठराव पास करण्यात आले.  सवर्णांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीस ठेवण्याचे, स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे  नागरिकत्वाचे अधिकार बजवण्यासाठी मदत करावी, मृत जनावरे ज्याची त्याने ओढावी, तसेच वार लावून स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थांना जेवण द्यावे.
 • मनुस्मृती हा हिंदू ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे. म्हणून मनुस्मृतीचे 25 डिसेंबर 1927 रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले होते.

शेतकऱ्यांसाठीचे योगदान

 • अस्पृश्यांप्रमाणेच शेतकऱ्यांसाठीही बाबासाहेबांनी अनेक दारे खुली केली.
 • जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची असेल तर शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकर्‍यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. तसेच आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. शेतकऱ्यांसाठी असे  विचार बाबासाहेबानी  ब्रिटिश सरकारच्या निर्दशनास आणून दिले होते.
 • सर्वप्रथम बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी पहिला संप हा 1928 -1934 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील चरी या गावात केला होता. हा संप बाबासाहेबानी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी केला होता.
 • 14 एप्रिल 1929 रोजी बाबासाहेबांनी आयोजित केलेल्या परिषदेत कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले होते. बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडले. व त्यानंतर 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांनी मोर्चा विधिमंडळात काढला होता.
 • शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाता सिंद्धात मांडला होता. तर एका मासिकेत शोधनिंबध सुद्धा प्रसिद्ध केला होता.
 • शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली.
 • नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते.

स्त्रीयांसाठी केलेले कार्य

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीमुक्ती आणि स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांच्यावर गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता.
 • बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे स्थापन केलेल्या मिलिंद  महाविद्यालयातही मुलीनाही प्रवेश दिला होता.
 • खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्ती वेतनाची तरतूद असे स्त्रीयांसाठी महत्त्वाचे निर्णय बाबासाहेबांनी घेतले होते.
 • तसेत कामगार व नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिले व्यक्ती होते.
 • अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसा हक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद असणारे हिंदू कोड बिलाचा प्रस्तावही बाबासाहेबांनी 1947 साली मांडला होता.

अर्थशास्त्राचे जाणकार

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर अर्थतज्ज्ञ होते. बाबासाहेबांचा व्यासंगाचा आणि चिंतनाचा विषय अर्थशास्त्र होता. संशोधक विद्यार्थी म्हणून जागतिक किर्तीच्या The Problem of Rupee हा ग्रंथाला डी.एस्सी पदवीने गौरविण्यात आला होता.
 • या संशोधन ग्रंथात ब्रिटिशांनी दिलेली अर्थव्यवस्था कारखान आणि जमीनदारांना कशी अनुकूल होतील हे नमूद करून ती कष्टकऱ्यांच्या बाजूने वळवली पाहिजे असे मत त्यांनी मांडले होते.
 • व्यापार पातळीवर बोलताना त्यांनी भारतीय रूपयाला डॉलर आणि पौंड यांच्या बरोबरीने आणण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्नांची अपेक्षा करीत होते.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) संकल्पना आंबेडकर यांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवर आधारित होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच बाबासाहेबांचे मोठे योगदान होते.

बाबासाहेब आणि कलम 370

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1947 साली कलम 370 बद्दल असे म्हणाले होते की, महार बटालियन लावून संपुर्ण काश्मीरच ताब्यात घ्या किंवा काश्मीर खोरे जेथे बहुसंख्य मुस्मिल आहेत. लडाख जेथे बौध्द आहेत आणि जम्मू जेथे हिंदू आहेत असे तीन भाग करुन लडाख आणि जम्मूचा भाग भारताला जोडा आणि काश्मीर खोरे जेथे मुस्लीम आहेत त्या भागात मतदान घेवून ज्यांना पाकिस्तान मध्ये जायचे आहे त्यांना पाकिस्तानमध्ये जावू द्या आणि ज्यांना भारतात राहायचे आहे त्यांना भारतात राहू द्या. हा सोपा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता.
 • भविष्यात हा प्रश्न तिव्ररुप धारण करेल याची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधीच होती म्हणूनच त्यांनी काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 लिहण्यास नकार दिला. मात्र, शेवटी पंडीत नेहरु यांच्या आग्रहाखातर गोपालस्वामी अयंगर यांनी हे कलम लिहले होते.

आज म्हणजेच 6 डिसेंबर 1956 साली दिल्लीत अलिपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेत बाबासाहेब आंबेडकर या महाप्रलयाचे निधन झाले. दिल्लीहून त्यांचे पाथिर्व विमानातून रात्री सव्वा तीन वाजता मुंबईत आणण्यात आले होते. दादर  येथील म्हणजेच सध्याची दादर चैत्यभूमिवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: