वसईत हत्यारांसह दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना पाच आरोपिंना रंगेहाथ पकडण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. यामधील एक आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडून पोलिसांनी हत्यारांसह 1 लाख 60 हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अधिकचा तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतून जाणाऱ्या मुंबई –अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक 8 च्या बाजूस असणाऱ्या बर्मासेल पंपावर आरोपी दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना वालीव पोलिसांनी धाड टाकून भोलु उर्फ भरत नरोत्तम शर्मा, समीर मोहम्मद शेख (22), सचिन कानिफनाथ आगवणे (29), दत्तात्रय कानिफनाथ आगवणे (31) मो, रहमत अब्दुल रहद (22) या पाच आरोपींना अटक केली. तर सहावा आरोपी नसीम अंधाराचा फायदा घेऊन निसटला.
पोलिसांनी आरोपीकडून एम.एच 48 एन 3572 क्रमांकाची बजाज आटो रिक्षा, 2 स्टीलचे चाकू, 16 इंच लांबीचा स्क्रू ड्रायव्हर, दोन गंज लागलेली पक्कड लाल मुठ असलेली, एक स्टीलचा एक्सो, १८ इंच लांबीची लोखंडी टॉमी दोन्ही कोपऱ्यास बाहेरील बाजूस वाकलेली व एका बाजूस दोन दात असलेली, १५ इंच लांबीचा लोखंडी रॉड असा असा 1 लाख 60 हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वालीव पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपीवर गुन्हा दाखल केला असून फरार नसीम याचा कसून शोध सुरु आहे. याप्रकरणी अधिकचा तपास वालीव पोलीस करीत आहे.