राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळालाय. आणि महाविकास आघाडीच सरकार आता सत्तेत येणार आहे. या सत्तेचा मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असणार आहेत. त्यामुळे उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्याची चर्चा रंगली आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही भावांमधील दूरावा कमी होण्याची चर्चा आहे.
महा विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. या निवडीनंतर आज सकाळीच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिले आहे. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. त्यामुळे ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपानं महाराष्ट्राला मिळणार आहे.
या सर्व घडामोडीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे या शपथविधीला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्याची चर्चा रंगली आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही भाव पुन्हा एकत्र येण्याची चर्चा रंगत आहे.