राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटला असून महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड झाली आहे. त्यानंतर आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधीत आलेल्या बहुजन विकास आघाडीचेआमदार हितेंद्र ठाकूर यांनी महाविकासआघाडीला पाठिंबा दर्शवला. सत्ता आमची असेल, असं म्हणत महाविकासआघाडीला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी संकेत दिले.
विधानभवनात आज सकाळपासूनच नवनिर्वाचित आमदारांना शपथविधी सुरु आहे. या शपथविधीत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांना सोबत घेण्याचा महाविकास आघाडीकडून विचार सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, राज्यात भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपला सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र हे वृत्त बविआने फेटाळले आहे.