विरार येथील म्हाडा कॉलनीमध्ये पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या 27 नोव्हेंबर रोजी राखीव घरांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे सोडत जाहीर होणार आहे. या घरांसाठी दोनशे ते अडीचशे जणांचे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या तीन वर्षापासून ही सोडत रखडली होती. मात्र या सोडतीला मुहूर्त मिळाल्याने पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पालघर पोलिसांना राहण्यासाठी घरे उपलब्ध व्हावी यासाठी पोलीस दलातर्फे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार विरारमधील बोळींज येथील टप्पा तीन मधील इमारत क्रमांक 10 मध्ये पोलीसांसाठी 186 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. यासाठी तीन वर्षापुर्वी पोलिसांमार्फत याबाबतचे अर्ज व घरांसाठी ठरविण्यात आलेली रक्कमेची डीडी भरण्यास सांगितले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी घरांसाठी सोडत जाहीर करण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव या घरांची सोडत जाहीर न झाल्याने पोलीस कर्मचारी या घरांच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान पोलिसांच्या घरांचे वितरण करण्यात यावे यासाठी नुकताच कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ विभागाचे अधिकारी व पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्यात बैठक पार पडली. यात पोलिसांच्या 186 राखीव घरांची सोडत जाहीर करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे हि सोडत उद्या बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी बोळींज येथे संगणकीय प्रणालीद्वारे जाहीर करण्यात येणार आहे.
109 घरांची सोडत
पोलिसांच्या घरासाठीचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाने मजूर केला होता. त्या प्रस्तावानुसार पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विरार येथे 186 घरे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र काही महिन्यापुर्वी पुण्याचे विभाजन होऊन पिंपरी चिंचवड येथे स्वतंत्र आयुक्तालय तयार करण्यात आल्याने पालघर जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे सर्व आस्थापन विभागाच्या नोंदी त्या ठिकाणी वर्ग केल्या गेल्या आहेत. मात्र शासनाने काढण्यात आलेल्या प्रस्तावात केवळ नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना घरे मिळवीत असे निर्देश असल्याने केवळ 109 अर्जदार यासाठी पात्र ठरले आहेत.