वसईत चार वर्षीय चिमुकल्याची गटारात पडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारण सदरचे गटार बंदिस्त करण्याची मागणी काही महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच हि घटना घडल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
आगाशी टेंभीपाडा येथे राहणारा हितांश मंगेश मेहेर सोमवारी अर्नाळा येथे मामाकडे राहायला गेला होता. यावेळी हितांश दुपारी आजीसोबत पाणी भरायला गेला होता. मात्र आजीचा डोळा चुकवून तो खेळण्यासाठी निघून गेला. त्यानंतर त्यांची कुटुंबीयांनी शोधाशोध केली मात्र तो सापडलाच नाही.
अखेर गावातील काही तरुणांना सायंकाळी 6.30 च्या सुमारास हितांशचा मृतदेह गटारात तरंगलेल्या आढळून आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गटार बंदिस्त करण्याची मागणी
मी जागृत बंदरपाडेकर परिवारा अंतर्गत अर्नाळा बंदरपाडाचे गटार प्रवाहित करत बंदिस्त करण्याची मागणी मोर्चा काढत अर्ज देत करण्यात आली होती. या संदर्भातील निवेदन 4 मे 2019 रोजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हि घटना घडल्याचे आता ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.