विरारमध्ये पोलीस ठाणे हद्दीत पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याकडून अवैध रेती उत्खनन प्रकरणी अचानकपणे केलेल्या कारवाईत वाळू माफियांनी पळून जाताना पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी आता ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 35 लाख 12 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास विरार उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे करीत आहे.
पोलीस अधीक्षक पालघर, फिर्यादी पोलीस शिपाई दिनेश महादु पाटील आणि चालक पोलीस शिपाई राहुल दळवी 17 नोव्हेंबरला मिरारोड बाजुला जात असताना त्यांना विरार पोलीस ठाणे हद्दीत खार्डी रेती बंदरात अवैद्य वाळू उत्खनन व वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस अधीक्षकानी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी खात्री केल्यानंतर अवैद्य वाळू उत्खनन सुरूच होते. यावेळी पोलीस आल्याची खबर मिळताच तीन आरोपीनी पळ काढला. यामधील एका आरोपींने चक्क पोलीस अधीक्षकांच्याच गाडीवर हल्ला चढवला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आता निरज लाला (29) रा. नालासोपारा, अनिल तुकाराम चव्हाण (26) रा.विरार आणि सुनिल इंद्रजीत चव्हाण (20) रा. वसई या आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपींकडून पोलीसांनी 2 कोटी 25 लाख रुपये किंमतीचे 3DX कंपनीची रेती आणि चिखलमातीने भरलेले 15 जेसीबी, 10 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा डंम्पर आणि 12 हजार रूपये किंमतीची 3 ब्रास रेती असा एकुण 2 कोटी 35 लाख 12 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींवर वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.