विरारमधील असंख्य गोर-गरीब नागरिकांवर आता उपाशी राहण्याची वेळ येणार नाही, कारण आता गोर-गरिबांसाठी हॅप्पी फ्रिज उभारण्यात आलय. या फ्रीजमुळे गोर-गरीबांच्या रोजच्या जेवणाची सोय होणार आहे. तसेच दररोज वाया जाणारे अन्न एखाद्या भुकेल्या व्यक्तीच्या पोटात जाणार आहे.
देशात असंख्य गोर-गरीब नागरीक असे आहेत ज्यांना रोज दोन वेळच अन्न नशीब होत नाही, त्याच धर्तीवर दररोज लाखो लोकांच पोट भरणार अन्न वाया जाण्याचे प्रकार समोर येतायत. हाच दुवा पकडत फीड इंडिया मुव्हमेंटने समाजातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपू नये यासाठी हॅप्पी फ्रिज संकल्पना उदयास आणली.
हिच समाजपयोगी संकल्पना विरार पूर्वेतील मनवेल पाडा येथील जळबाववाडी मित्र मंडळाने जळबाववाडी येथे सुरु केली आहे. काल या हॅप्पी फ्रिजचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी या गरजूंसाठी फ्रीजमध्ये अन्न व पाणी ठेवण्यात आली होते. याचा लाभ आता गरजू गोर-गरिबांना घेता येणार आहे.
या प्रसंगी बातमीदार व जळबाववाडी मित्र मंडळ स्थानिक नागरिकांना आवाहन करू इच्छितो कि, आपल्याकडे उरलेले अन्न फेकून न देता ते हॅप्पी फ्रिजमध्ये येऊन दान करावे. जेणेकरून शहरात भूकेल्यापोटी झोपणाऱ्या गोर-गरीबांना या अन्नाने पोट भरता येईल. त्यामुळे मोठ्या संख्येने या समाज कार्यात हातभार लावा.