संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे तानाजी मालुसरे यांच्यावर जीवनपट तयार होत आहे.या जीवनपटाचा सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर्स आता भेटीला आले आहेत. या सिनेमामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
आधी लगीन कोंढाण्याचं… म्हणत आपल्या मुलाचं लग्न थांबवून शिवाजी महाराजांसाठी शहीद होणारा शिव छत्रपतीचा शूर मावळा म्हणजे तानाजी मालुसरे. या शूर लढवय्याची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहण्याजोगी असणार आहे.
या सिनेमामध्ये अजय देवगण ‘तानाजी मालुसरे’ यांची भूमिका साकारणार आहे. सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या मुहूर्ताचे क्षण रसिकांसोबत शेअर करण्यात आले आहेत.