आगामी काळात मिरा-भाईंदर शहराता अत्याधुनिक आणि अधिक स्मार्ट शहर बनवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांनी केले. मिरारोडच्या सेवन स्क्वेअर शाळेच्या मैदानात आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात नरेंद्र मेहता यांच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
‘प्रगतीपथ’ या नावाने प्रकाशित केलेल्या या 28 पानी जाहिरनाम्यात मेहतांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची लेखाजोखा दिली असून आगामी काळात शहराच्या विकासासाठीच्या योजनांची यादी सादर करण्यात आली आहे.
जाहिरनाम्यातील काही मुद्दे
- जाहिरनाम्याच्या सुरूवातीलाच मेहता यांनी शहराच्या विकासाबाबत मतदारांशी संवाद साधत शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
- यामध्ये प्रामुख्याने मिरा भाईंदर शहरासाठी मंजूर केलेल्या 1800 कोटींच्या सुर्या योजनेचा उल्लेख करण्यात आलाय.
- शहराला प्रतिदिन साडे सात कोटी लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचाही उल्लेख आहे.
- तसेच स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शहरातले काँक्रिटीकरण झालेले 18 रस्ते, सभागृह आणि नाट्यगृहांचे लोकार्पण, शहरात 13 ठिकाणी उभारली जात असलेली भाजी मार्केट्स, महिला सक्षमीकरणासाठी राबविलेल्या विविध योजना, रेल्वे स्थानक सुशोभिकरण, मैदाने, परिवहन सेवा, जलपरिवहन आणि रो-रो सेवा, अग्निशामक दलाचे अद्ययावतीकरण, वाचनालये आणि अभ्यासिका, आगरी कोळी भवन, आंबेडकर भवन, पं.भीमसेन जोशी रुग्णालय यासारख्या कामांबाबतची माहितीही देण्यात आलीय.
- विशेष म्हणजे शहरासाठी मेहतांच्या प्रयत्नातून आलेल्या पोलीस आयुक्तालय, तहसिलदार कार्यालय, उपनिबंधक कार्यालय आणि न्यायालयांचाही उल्लेख या जाहिरनाम्यात आहे.
- याशिवाय मेट्रो रेल्वे प्रकल्प, वर्सोवा खाडी पूल अशा प्रगतीपथावर असलेल्या कामांची सद्यस्थितीही नमूद करण्यात आलीय.
- याशिवाय आगामी काळात मेहतांचे कोणत्या कामांचे प्राधान्य असेल, अशा 18 आश्वासनांची यादीही देण्यात आलीय.
काय म्हणाले नरेंद्र मेहता?
व्यक्तिगत मतभेद हे राष्ट्रहितापेक्षा मोठे नाहीत. आपल्यातल्या मतभेदासाठी देशाला किंवा राज्याला वेठीस धरता कामा नये, असे वक्तव्य मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहतांनी केले. मताचे विभाजन झाले तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपआपसातील मतभेद विसरून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करा, असेही मेहता म्हणाले.