पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेतून बंडखोरी करुन राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमित घोडा यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. तीनच दिवसात अमित घोडा स्वगृही परतले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर घोडांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेवदारी अर्ज दाखल केला होत. मात्र आता त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. दरम्यान, काँग्रेसचे योगेश नम यांनी देखील अर्ज भरला होता त्यामुळे ते आता आघाडीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत.
मानखुर्दत रिपाईची माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाराजांची मनधरणी सर्वच पक्ष करत आहेत. अशातच मुंबईच्या मानखुर्द-शिवाजीनगर मतदार संघात रिपाईच्या उमेदवाराची मनधरणी करण्यात सेनेला यश आले आहे. गौतम सोनावणे यांनी रिपाई कडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत सेनेच्या उमेदवाऱ्याला आव्हान दिल होत. मात्र आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
सेना उमेदवाराला फायदा
रिपाईचे अध्यक्ष यांच्याशी बोल्यानंतर गौतम सोनावणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे सांगितले. सोनावणे हे रिपाईचे मुंबई अध्यक्ष आहेत. रामदास अठवले यांनी युती धर्म पाळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना त्याचा लाभ होणार आहे.