विरारमध्ये डेंग्युची लागन झाल्याने तिसरा बळी गेल्याची घटना घडलीय. या घटनेने वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतेय. त्यामुळे जर महापालिका स्वच्छतेवर कोट्यवधी खर्च करतानाही डेंग्यू सदृश्य आजार येतात तरी कुठून असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
विरार पश्चिमेकडील बोळींज येथील प्रमिला वासुदेव नाईक (64) या महिलेस ताप आल्याने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारात काहीच फरक पडत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्रमिला यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र दुदैवाने बुधवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याच दिवशी विजय वल्लभ रुग्णालयात वंदना प्रेमनाथ पाटील (35) या महिलेचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. वंदना हिला मंगळवारी पहाटे 3.00 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील तुलसी अपार्टमेंट राहणाऱ्या आकाश सोमनाथ विश्वकर्मा (14) या मुलाचा गुरुवारी डेंग्यूने मृत्यू झाला. बुधवारी त्याला विजय नगरच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरच्या तपासात त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे हे मृत्यू झाल्याचा संताप आता शहरात व्यक्त होत आहे. दरम्यान पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार डेंग्यूचा सप्टेंबरचा आकडा 15 वर पोहोचला आहे. तसेच वसई-विरार शहरातील मनवेल पाडा, जळबाववाडी, कारगिल नगर, तुळींज रोड, आचोळे तलाव व संतोष भवन या परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने यावर काहीच उपाययोजना न केल्यास हा आकडा आणखीन वाढणार आहे.
पावसाळ्यात जीवघेणे रोग बळाण्याचा धोका असताना महापालिकेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे होते. मात्र, या पातळीवर महापालिका ढिम्म राहिली, असा संताप परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होतोय.
“वसई-विरार शहरात झालेल्या जलभरणीने मोठी रोगराई पसरत आहे. त्यामुळे विविध प्रभागात स्वच्छतेचा अभाव दिसतोय. तसेच पालिकेतर्फे रोग निर्मुलन आणि रोगप्रतिबंधक उपाय सुरू केले असले महापालिकेने सर्व प्रभागांत नियमितपणे औषध फवारणी करणे गरजेचे आहे.”– प्रशांत पाटील, स्थानिक