राज्यासह मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांत पडून नागरिक जखमी होतोय व मरतोय अशी अवस्था आहे. मात्र रस्त्यांतील खडडे काय बुजायच नाव घेत नाही आहे. या खड्ड्यांच्या प्रश्नांसाठी आता मनसेचे इंजिन धावणार आहे. मनसे तर्फे ‘सेल्फी विथ खड्डा’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेत विजेते ठरणाऱ्याला आकर्षक पारितोषिकही देण्यात येणार आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी वर्सोवा येथील चौकाचौकांवर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीत नागरिकांना ‘सेल्फी विथ खड्डा’ मोहिमेत खड्ड्यांचे फोटो पाठवून स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच यासाठी त्यांनी पारितोषिक देखील ठेवले आहेत. पहिल्या क्रमांकाला ३ हजार, दुसऱ्या क्रमांकाला २ हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरू असेल, असे देखील बॅनरमध्ये सांगण्यात आले आहे.
कोकणातही मोहीम सुरु
मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा फटका गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला होता. या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोकणातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यावरून मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘सेल्फी विथ रस्ते खड्डा’ ही मोहीम हाती घेतली. त्यांनी देखील ५ हजार, ३ हजार आणि २ हजार अशी बक्षिसे ठेवली आहेत.
मुंबई महापालिकेला आली जाग
मुंबई महानगरपालिकेने खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नवीन अॅप्लिकेशन आणलेय. पालिकेने mybmcpotholefixit नावाचं एक नवं मोबाईल Application लाँच केले आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयावर टीका होतेय. पावसाळा संपायला अवघे काही दिवस उरले असताना पालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी अॅप्लिकेशन आणल्याची टीका होतेय.
Mumbai, we've found a 'hole'-some solution to pothole woes! See a cavity? Report it with the new MyBMC Pothole Fixit app which identifies its location & keeps you updated on the resolution of your complaint. Together, let's smoothen the road to progress: https://t.co/eH6CsOifYF pic.twitter.com/dGnwI9oSwI
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019
रस्त्यांवर खड्डे दिसल्यास त्याची या अॅपद्वारे तक्रार करण्याचं आवाहन बीएमसीद्वारे करण्यात आलं आहे. तक्रार केल्यानंतर तेथील खड्डे बीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून बुजवले जातील.