भारताने नुकतेच जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवले. हे कलम हटवल्याने काश्मीरमधील दहशतवादी कारवाया ठप्प झाल्या होत्या. यांनतर आज पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी देणारी भूमिका घेत भारताविरोधात बदला घेण्याच्या हेतुने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची सुटका केल्याचे सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची तुरूंगातून गुपचूप सुटका केली असल्याची धक्कदायक माहिती समोर आलीय. मसूद अझहर हा 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते.
‘पाकिस्तान अतिरेक्यांना अटक करतो असे सांगून कारवाईचा दिखावा करतो. अमेरिका पाकिस्तानच्या या नापाक कारवाईवर विश्वास ठेवते. मात्र काही काळानंतर पाकिस्तान अतिरेक्यांची सुटका करून दहशतवादाला खतपाणी घालतो हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताविरोधात पुन्हा एकदा मसूद अझरचा वापर पाकिस्तान करू शकतो अशी आता भीती निर्माण झाली आहे’. असे उज्ज्वल निकम म्हणाले. पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर आम्ही चूप बसणार नाही. आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो.ही त्यांची भूमिका व मसूद अजहरची आज सुटका होणे याचा अर्थ पाकिस्तानला पुन्हा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई करायची आहे, असे निकम म्हणाले. दरम्यान आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.