आजकल डीएसएलआर हाती आला कि कोणीही स्वत:ला फोटोग्राफर समजतो. मात्र एक फोटोग्राफर होणे म्हणजे काय असते. तसेच आज जागतिक फोटोग्राफी दिवस का साजरा केला जातो, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.
आज १९ ऑगस्ट. जगभरात आजचा दिवस हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. आज पासून अंदाजे १७७ वर्षा आधी म्हणजेच १८३९ साली फ्रान्समध्ये छायाचित्रणाची प्रथम सुरूवात झाली. १९ ऑगस्ट रोजी फ्रान्सने छायाचित्रणाच्या अविष्काराला मान्यता दिली होती म्हणूनच हा दिवस छायाचित्र दिन रूपात साजरा केला जातो. त्यामुळे व्यावसायिक आणि सर्व हौशी छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्र दिनाच्या बातमीदार तर्फे शुभेच्छा!
इतिहास
- लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी १८३७ मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. साधारण सन १८०० मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली. तर १९ ऑगस्ट १८३७ रोजी फ्रान्स सरकारने या पेटंटची खरेदी केली आणि जगाला छायाचित्रणाच्या मदतीने एक सुंदरशी भेटवस्तूच दिली असे म्हणण वावग ठरणार नाही.
- दगेरोटाईप या पद्धतीने काढलेला फोटो हा पहिला फोटो नव्हता त्याआधी; १८२६ मध्ये नायपे यांनी हेलिओग्राफी पद्धतीने ‘व्ह्यू फ्रॉम द विन्डो अॅड ल ग्रास’ या नावाने छायाचित्र प्रसिद्ध केले होते.
- १८६१ मध्ये थॉमस सटन यांनी टिकावू रंगीत छायाचित्र कसा घ्यावा, याचा शोध लावला. त्यांनी लाल, हिरवा आणि निळा रंग फिल्टर सर्वप्रथम वापरला. मात्र, तंत्रज्ञान पुरेसे विकसित नव्हते. त्यामुळे छायाचित्राचा दर्जा फारसा चांगला नव्हता.
का साजरा केला जातो?
जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्याचा मागचा हेतू इतकाच आहे. माणसाच्या विचारांना व्यक्त करण्याची संधी देणे तसेच या क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देणे व लोकांच्या कामाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
कसा साजरा केला जातो?
भारतात जागतिक छायाचित्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर हा दिवस कोणत्या एका ठिकाणी साजरा केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करतात. या दिनानिमित्त शाळा, कॉलेज, महाविद्यालयामध्ये छायाचित्रणाच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असून छायाचित्रणाला प्रोत्साहन दिले जाते.