Ads
ब्लॉग्स

पावसात प्रवास करताना कशी घ्याल काळजी; जाणून घ्या…

डेस्क desk team

सध्या बरसणाऱ्या पावसाने माणसाला सुखावले मात्र या पावसाळ्यात वाहन चालवणे धोकादायक बनते. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवास करत असतांना काळजी घेणे महत्वाचे ठरते. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठयाप्रमाणात खड्डे असतात. रस्त्यांवर पाणी असल्याने खड्डयांचा अंदाज घेता येणे कठीण होते. त्यात भरीसभर म्हणजे रस्त्यांवर चीखल आणि ऑइल पडलेले असल्याने हमखास दुचाकी वाहन घसरण्याचा धोका असतो. तसेच धुक्यामुळे सामोरून येणारे वाहन चालकाच्या दृष्टीस पडत नाही. अशा अनेक कारणांमुळे पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व स्वत:चा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहन चालवत असतांना काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे असते.

वाहनांमधील यांत्रिक कारणांमुळे अपघात होतातच मात्र अपघात हे मानवी हलगर्जीपणा, बेशिस्तपणा, वाहतूक नियम न पाळणे यामुळे देखील होतात. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या ऋतूमध्ये माणूस आपला पोषाख, केस, त्वचा यांची ज्या पध्दतीने काळजी घेत असतो तशीच काळजी पावसाळयात आपण आपल्या वाहनाची घेतली पाहिजे. वाहनाचा ब्रेक, इंजिन, एक्सीलेटर, ऑइल, क्लच, टायर, बॅटरी या सर्व यंत्रणा सतत तपासणे गरजेचे आहे. फोरव्हीलर चालकांनी तसेच रिक्षा व बस चालकांनी वाहन चालवतांना समोरील काचेवर असणारे वाइपर सुव्यवस्थित आहे का? हे तपासले पाहिजे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सगळ्याच वृत्तपत्रांमधून चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटणे, भरधाव वाहनाने रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीस धडक देणे, दोन वेगवेगळ्या वाहनांमध्ये धडक होऊन अपघात होणे, रस्त्यावर दुचाकी स्लिप होणे अशाप्रकारच्या अपघातांच्या बातम्या जास्त वाचनात येतात. यामुळे पावसाळ्यात बिनधास्त व बेशिस्त वाहन चालवून जीव धोक्यात आणण्यापेक्षा नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास केला पाहिजे.

दिवसागणिक वाढत जाणारी वाहन संख्या विचारात घेता वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्ताने शासनाच्या परिवहन विभागामार्फत वाहन चालवितांना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येतो. यातून वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येते. मुळातच वाहतुकीचे नियम सहज पाळता येण्यासारखे आहेत. उदाहरण- वाहन चालवत असतांना वेगाची मर्यादा पाळली पाहिजे, ओव्हरटेकिंग, लेन कटिंग करू नये, गाडीची लेन चेंज करायची असेल तर सिग्नल द्यायचा लक्षात ठेवा, सीट बेल्ट, हेल्मेट यांचा वापर करावा, रात्रीच्या वेळी गाडी चालवत असतांना गाडीच्या पुढील व मागील दिवे चालू ठेवावे, वाहन चालवत असतांना कानात एअर फोन लावून गाणी ऐकणे तसेच मोबाईलवर बोलणे टाळावे. आजकाल मोठ्याप्रमाणावर वाहन चालवत असतांना मोबाईलचा वापर केला जातो. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. वाहनामध्ये जास्त प्रवासी भरू नये. हे साधारण छोटे छोटे नियम आपण अंगीकारणे गरजेचे आहे. पावसाळी प्रवासात या सर्व नियमांचे पालन केल्यास अपघातांची संख्या घटण्यास मदत होईल.

पावसाचा जोर वाढल्यावर अनेकदा लोकलसेवा खोळंबते. अशावेळी सगळ्या चाकरमान्यांना घरी लवकर पोहचायचे असते. त्यामुळे बस, टॅक्सी, रिक्षा या वाहनांचा वापर केला जातो. यावेळी बस, टॅक्सी, रिक्षा या वाहन चालकांनी वाहनाच्या प्रवास क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये. ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनचालकाने याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. उडाणपूल, महामार्ग येथे वाहतूककोंडी मोठ्याप्रमाणावर होत असते. त्यामुळे वाहन एका रांगेतच चालवले पाहिजे. जास्त वेगाने वाहन चालविल्यास अपघाताची शक्यता असते. या वाहतूककोंडीमध्ये वाहनचालकाने संयम ठेवून वाहन चालवावे. ओव्हरटेक करून अपघातांना निमंत्रण देऊ नये. बस, ट्रक अश्या मोठ्या वाहनांच्या मागून वाहन चालवत असतांना विशिष्ट अंतर ठेवले पाहिजे जेणेकरून पुढील वाहनाने रिव्हर्स गिअर घेतल्यावर ते वाहन मागच्या वाहनास धडकणार नाही.

दिवसागणिक वाढत जाणारी लोकसंख्या, वाहन संख्या त्यात पाऊस तसेच प्रत्येकाला वेळेत पोहोचण्याची घाई या सगळ्यात माणूस आपला मौल्यवान जीव धोक्यात घालतो. आजचा सुरक्षित प्रवास उद्याचं जीवन सुखकर करणारा असेल म्हणूनच प्रत्येकाने पावसाळ्यात व इतर वेळेस सुद्धा वाहन चालवत असतांना सतर्क राहून, संयम ठेवून व वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा. चला तर मग काळजीपूर्वक प्रवासातून योग्य दिशा गाठूयात अपघातांची संख्या कमी करूयात.

काय करावे?

 • घरातून निघण्याआधी वाहनांची सुस्थिती तपासणे.
 • आपल्या वाहनांची संपूर्ण टेक्निकल माहिती करून घ्या.
 • बस, ट्रक यासारख्या मोठ्या वाहनांच्या मागून गाडी चालवत असतांना अंतर ठेवा.
 • वाहनाच्या मागच्या बाजूला लाल परावर्तक व पुढच्या बाजूला पांढरे परावर्तक असणे आवश्यक आहे.
 • वाहनाचे सर्व टायर चांगले आहेत याची खात्री करून घ्या.
 • पावसाळ्यात गाड्यांचा अंदाज घेणे कठीण असते त्यामुळे सिग्नल फॉलो करूनच वाहन चालवा.
 • हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करणे विसरू नका.
 • पावसाळ्यात धुक्यात वाहन चालवत असतांना दिवसासुध्दा हेडलाईट चालू ठेवा.

काय करू नये?

 • पावसाळ्यात वाहनाचा वेग एकदम वाढवणे व एकदम ब्रेक दाबणे टाळावे.
 • साचलेल्या पाण्यातून, वाहत्या पाण्यातून वाहन चालवणे टाळा.
 • विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
 • पावसाळ्यात फिरायला किंवा लॉंग ड्राइव्हसाठी जात असतांना वाहनांमध्ये शर्यत लावू नका
 • अमलीपदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नका.
 • वाहन चालवत असतांना मोबाईलवर बोलू नका.
 • ऑटो लॉक गाड्यांमधून पावसात प्रवास करतांना गाडीच्या काचा बंद करू नका.
 • वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.

रिताली तपासे, जनसंपर्क अधिकारी

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: