अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन ठेपले असतानाच, आपल्या भावाला नेमकी कोणती राखी आवडेल? सध्या कोणत्या राख्यांचा ट्रेंड आहे? असा विचार सध्या बहीणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील श्रीरंग संस्थेने बोलीभाषेचे महत्त्व पटवणाऱ्या राख्या बाजारात आणल्या आहेत. या राख्यांमधून बोलीभाषा टिकवण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
श्रीरंग संस्था ही गरजवंतांना व दिव्यांगाना सामाजिक व आर्थिकरित्या आधार देणारी संस्था असून तिने एक नवा उपक्रम हाती घेतलाय.आजकालच्या ‘ब्रो’ आणि ‘सिस’च्या जमान्यात संस्थेने मराठीपण जपणाऱ्या माई, आक्का, भावड्या, भाऊराया, दिद्या, दादूस, दाद्या असे म्हणणं हक्काचे, आपुलकीच वाटणाऱ्या राख्या बाजारात आणल्या आहेत.
आपण कितीही इंग्रजी शब्दांचा वापर केला तरी आपल्या बोलीतले हे शब्द नात्यात जीवाळा वाढवताना दिसतात. त्यामुळे या मराठी शब्दांवर आधारित राख्यांचा प्रचार श्रीरंग संस्थेतर्फे केला जात आहे. हे उपक्रम राबवण्याचे उद्देश म्हणजे रक्षाबंधन साजरा करताना आपल्या आईसमान असलेली बोलीभाषा देखील जगवा असे आहे.
दरम्यान, श्रीरंग संस्थेने या संकल्पनेवर आधारित एक व्हिडीओ बनविला आहे. त्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या व्हिडिओत पोलीस, कामगार, रुग्णांच्या हातात बोलीभाषेचा प्रचार करणारी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जात आहे.
कलादिग्दर्शक सुमित पाटील यांची ही संकल्पना असून आवाजाचे जादूगार उदय सबनीस यांचा आवाज या व्हिडीओत ऐकायला मिळतोय. तसेच ‘रक्षाबंधन साजरा करताना बोलीभाषेचा विसर पडू देऊ नका’ हा व्हिडीओ बनवण्यामागचा हेतू असल्याचे संस्थेचे संस्थापक सुमित पाटील सांगतात.